कात्रज ते कानिफनाथ: श्रम, श्वास आणि साधनेचा अनुभव" |टेकडी ते ताडासन

🌄 कात्रज ते कानिफनाथ ट्रेक: चुकता चुकता शिकलेला एक सुंदर प्रवास!


ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः

काही गोष्टी सतत मनात रेघोट्या घालत असतात – यापैकी एक म्हणजे कात्रज ते कानिफनाथ ट्रेक. "कधी तरी करायचंय" म्हणत म्हणत काळ उलटत गेला. शेवटी एक दिवस मनात म्हटलं, बस झाला आता विचार... ट्रेक करायचाच!

🥣 सुरुवात गरम इडली-वडा सांबरने...

सकाळी 5:30 ची बस पकडून आम्ही कात्रजला पोहोचलो. बस स्टॉपच्या आसपास गरमागरम इडली-वड्याचा वास नाकात शिरला आणि आमचं ट्रेकिंगचं भान विसरून आम्ही आधी ‘पोटपूजा’ करण्याचा निर्णय घेतला. नाहीतर ट्रेकमध्ये कमी आणि पोटात ढुश्या जास्त असा अनुभव येण्याची शक्यता होती 😄.

🛣️ सुरुवातीपासून थोडीशी गडबड...

इडली-यात्रेनंतर आम्ही शिवापूरकडे जाणारी बस पकडली आणि कात्रज घाटातून जुना कात्रज बोगदा पार करून बस स्टॉप वरती उतरलो आणि तिथेच पीडब्ल्यूडी ऑफिस शेजारून जो रस्ता  बोगद्याच्या वरच्या बाजूला जातो त्या पायवाटेने पाच ते सात मिनिटांची चढण चढून बोगद्यावर असलेल्या वाघजाईमाता मंदिर जवळ पोहोचलो.


वाघजाई माता मंदिर, कात्रज जुना बोगदा, k2s स्टार्टिंग पॉईंट, कात्रज कानिफनाथ

वाघजाई माता मंदिर कात्रज जुना बोगद्याच्या वरती


ते छोटेसे मंदिर मध्ये दर्शन घेऊन, त्यानंतर  पुण्याच्या दिशेने तोंड केल्यानंतर डाव्या हाताची वाट सिंहगडला जाते आणि उजव्या हाताची वाट कानिफनाथ ला जाते , आणि मग कानिफनाथच्या दिशेने आम्ही वाटचाल करायला सुरुवात केली वाटेमध्ये तीन मोबाईलचे टॉवर आणि त्यांचे देखभाल केबिन लागतात ते क्रॉस करून आम्ही पुढे निघालो, पावसाने दोन दिवस काहीशी विश्रांती घेतल्यामुळे पायवाट तशी कोरडी होती. पण सगळीकडे मस्त हिरवळ होती, वातावरणात छान आल्हाददायकपणा होता, पुढे चालत असताना ज्या आंबील ढग डोंगरावर भगवा झेंडा ही निशाणी होती ती दिसेना आणि समोरच्या डोंगराकडे जायची पायवाट पण गवत असल्याने कळेना...

पण थोडी डाव्या बाजूला वळत जाणारी एक अतिशय चांगली मळलेली पायवाट होती, त्या वाटेने चालत राहिलो  वाटत एके ठिकाणी खडकांवरती पांढरा रंग आणि मारलेला arrow देखील दिसला परंतु नेमकी तिथेच चूक झाली दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की आम्ही  येवलेवाडीच्या दिशेला निघालो आहे , रस्ता चुकल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा आम्ही मागे आलो एक डोंगरावरती फक्त झेंड्याचा खांब दिसला आणि लक्षात आला की भगवा तिथे फडकत नसेल तरी देखील हाच आंबिलढग डोंगर आहे आणि मग पुन्हा आम्ही माग येऊन तो चढायला सुरुवात केली ज्या बाजूने आम्ही सुरुवात केली ती बऱ्यापैकी उभी चढण होती..

दमछाक करणाऱ्या त्या वाटेने आम्ही डोंगराच्या माथ्यावरती पोहोचलो. तिथे भगवा झेंडा शिल्लक राहिला  नव्हता फक्त खांब होता. वरती बसून थोडासा अल्पोपहार घेतला. 

आंबील ढग डोंगर , कात्रज कानिफनाथ ट्रेक
हाच तो आंबीलढग डोंगर आणि भगवा झेंडा जो आता थोडासाच शिल्लक आहे

पुढे काही अंतरावर फोटोग्राफी करणारे दोस्त भेटले, त्यांनी पुढचा मार्ग सांगितला – " दरी उतरून जंगलातून पुढच्या डोंगराकडे जा तो डोंगर चढा, आणि मग बापदेव घाट मंदिर दिसेल."

आंबीलढग डोंगर
आंबीलढग डोंगरावरून दिसणारा नजारा

टीप: हा सगळा टापू तसा निर्मनुष्य आहे...पण वाट चुकून हरवण्याची शक्यता खूप कमी आहे, पायथ्याच्या लोकवस्तीचे दृश्य सतत दिसत असते, आणि कात्रज घाटातली वाहने आणि डोंगरावर असलेले मोबाईल टॉवर आपल्याला दिसत असल्याने  दिशाभूल होण्याची शक्यता कमीच. तरी सावधगिरी बाळगावी.


🥵 डोंगर – दरी – डोंगर !

वाटेत भेटलेल्या मित्रांनी सांगितलेल्या वाटेने आम्ही डोंगर उतरून जंगलामध्ये प्रवेश केला घनदाट नसलं तरी दाट झाडे नक्की आहे , सावली असते इतकी झाडे आहे पण मिळालेली पायवाट आहे..


कात्रज कानिफनाथ ट्रेक
हीच ती जंगलातून जाणारी पायवाट


या पायवाटेने जंगलातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक छोटा डोंगर लागतो तो चढून गेला की त्याच्या समोर एक मोठा डोंगर आहे थोडी दमछाक करतो पण फार अवघड नाही, साधारण 10 मिनिटात आपण वर पोहचतो..

कात्रज कानिफनाथ ट्रेक


मग काय, डोंगर चढा, दरी उतर, डोंगर चढा – हाच आमचा ठरलेला मंत्र! घामेघूम, पण उत्साही! या डोंगरावरून बोपदेव घाटातील मंदिर दिसायला सुरुवात होते या डोंगरासमोरचा आणखी एक डोंगर आहे, तो डोंगर चढून गेल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला प्रचंड मोठे मैदानासारखे पठार दिसते आणि त्या पठाराच्या दुसऱ्या टोकालाच बोपदेव घाटातील मंदिर दिसू लागते व त्यापुढील कानिफनाथ मंदिर पण दिसू लागते.

पण हा शेवटचा डोंगर उतरताना मात्र काळजीपूर्वक खूप ठिकाणी घसरडे आहे पावसामुळे नाही परंतु एकंदरीतच त्याची रचना तशी आहे मग थोडं थोडं बसत उतरावं लागतं 

कात्रज कानिफनाथ ट्रेक
हाच तो बोपदेव घाटाच्या अलीकडे शेवटचा डोंगर ज्याच्या वरून उतरताना काळजी घ्यावी लागते

शेवटचा हा डोंगर पार करून एका मोठ्या मैदानात आलो. काही स्टुडंट्स तिथं मिलिटरी स्टाईल प्रॅक्टिस करत होते – आम्ही मात्र ‘थोडं आराम करूया’ या मोडमध्ये गेलो 😅.

इथून पुढे दोन अतिशय छोट्या टेकड्या चढून गेल्यानंतर आपण बोपदेव घाटाच्या रस्त्या जवळ येतो. या ठिकाणी चांगली रहदारी आहे भरपूर हॉटेल्स आहे चहा नाश्ता पाणी व्यवस्थित मिळू शकते...

🚧 आणि मग आला बंद रस्ता – ट्रेक वाढला १० वरून २० किमी!

बोपदेव मंदिराजवळ समजलं की कानिफनाथकडे जाणारा पारंपारिक ट्रेक रस्ता रस्ता बंद केला आहे – खासगी प्रॉपर्टीमुळे आता तिथं अनेक कंपाउंड बांधलेला आहेत काही ठिकाणी गेट करून पायवाट बंद केली आहे.


🙏 शेवटी पोहोचलो कानिफनाथ मंदिरात!

स्थानिकांनी सांगितल्यानुसार आम्ही डांबरी रस्त्याने भिवरी गावाच्या दिशेने एक किलोमीटर चालत पुढे गेलो ... तिथे ’प्रेमाचा चहा’ नावाचे चहाचे  हॉटेल लागले, चहा अतिशय चांगला होता,  सुंदर चहाचा आनंद घेऊन आम्ही त्यांच्याकडे पुढील रस्ता विचारला , त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही वेगवेगळ्या शेतातल्या भिंती,बांधा बांधाने, मळ्यातली घरे पार करत चाललो. रस्ता काही संपेना, एकूण चार तासांचा ट्रेक सहा तास झाले तरी संपेना. अनेक खाजगी प्रॉपर्टी , शेती , वाड्या, वस्ती अशी वाटचाल करत करत रस्ता शोधत शोधत , विचारत विचारत...निघालो होतो. 


ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः

ॐ चैतन्य कानिफनाथाय नमः

शेवटी, कानिफनाथ मंदिराच्या मागच्या बाजूने पोहोचलो. शरीर थोड थकले होते, पण मनात समाधान – कारण दरम्यानच्या चुका शिकवून गेल्या, आणि ट्रेकने मन आनंदाने भरून टाकलं.

मागच्या बाजूचा डोंगर चढून मंदिरामध्ये पोहोचलो, मंदिरामध्ये हातपाय धुऊन, स्वच्छ होऊन शांतपणे दर्शन घेतले दहा मिनिटे मंदिरात ध्यान लावलं मन शांत झाले थकवा ही दूर झाला आणि मग पुन्हा एकदा नव्या ऊर्जेने सुरू केली परतीची वाटचाल. रविवार असल्याने मंदिरात खूप गर्दी होती त्यामुळे गाभाऱ्यात जाऊन मूर्तीचे दर्शन घेता आले नाही.

मंदिर परिसर अतिशय स्वच्छ सुंदर व पवित्र आणि संपूर्ण भरलेल्या वातावरणाचा आहे. पावलोपावली आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती येत राहते. मनोभावे दर्शन घ्या. मंदिरांच्या नियमांचा आदर करा स्वच्छता पाळा , दुपारच्या वेळेत पोहचला तर भोजन प्रसाद देखील मिळतो. जमेल तशी मंदिर कार्याला यथाशक्ती मदत करा.

दर्शनाला आलेल्या प्रायव्हेट कार मध्ये जागा असलेल्या एका व्यक्तीने आम्हाला कानिफनाथ फाट्यापर्यंत सोडले आणि तिथून पीएमपीने कात्रज येथे पोहोचलो.

कानिफनाथ मंदिर सासवड पुणे
कानिफनाथ मंदिर सासवड पुणे

हा ट्रेक साधारण 7 ते 8 किमी व चार तासांचा आहे , आम्ही मात्र 20 किमी 8 तास एव्हढ्या वेळेत पूर्ण केला ...

कारण सुरुवातीच्या टप्प्यात वाट चुकून अडीच तीन किलोमीटर जास्ती चाललो...

बोपदेव घाटाच्या पुढचा पारंपारिक ट्रेक रस्ता बंद झाल्याने अनेक ठिकाणी फिरून फिरून मंदिरापर्यंत पोहोचावे लागले.

💡 काही ट्रेक टिप्स – अनुभवाच्या आधारे!

  • प्रत्येकी कमीत कमी ३ लिटर पाणी सोबत ठेवा – वाटेत पाण्याची सोय नाही.
  • डबा, सुकामेवा सोबत ठेवा – इडली सांबर तिथं नाही मिळणार 😉
  • पावसाळ्यात वाटा हरवतात – वाटेचा अंदाज घ्या आणि GPS डाउनलोड करा, gpx मिळत असेल तर बघा.
  • बापदेव घाट जवळचा डोंगरावर उतरताना सावध – थोडं घसरणारी वाट आहे.
  • ज्यांना त्या प्रायव्हेट प्रॉपर्टी शॉर्टकटचा रस्ता माहिती आहे, त्यांनी आधीच माहिती करून घ्या.
  • चांगल्या grip चे बूट वापरा
  • हा ट्रेक उन्हाळ्यात करणे त्रासदायक होऊ शकते.
  • कात्रज पी एम पी बस स्टॉप – कात्रज घाट बोगदा बसेस सहज उपलब्ध आहेत.
  • कानिफनाथ मंदिर ते कानिफनाथ मंदिर फाटा या अंतरासाठी फक्त वाहनाची सोय नाही, देवस्थान ट्रस्टची एको गर्दीनुसार फाट्यावरून मंदिरापर्यंत आणि मंदिरापासून फाट्यापर्यंत सेवा देते 
  • देवस्थानला भेट देऊन परत जाणाऱ्या प्रायव्हेट कार मध्ये रिक्षामध्ये जर जागा मिळत असेल तर फाट्यापर्यंत जाता येते. 
  • कानिफनाथ फाट्यापासून सासवड किंवा कात्रज येथे जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.
  • मंदिरात फोटो काढण्यासाठी परवानगी नाही त्यांच्या नियमांचा आपण आदर केला पाहिजे. 
  • मंदिराच्या आत मध्ये मुख्य गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी आपल्याला शर्ट काढून छोट्याशा खिडकी वजा चौकोनाच्या आकारातून आत जावं लागतं याची नोंद घ्यावी.

🔚 निष्कर्ष – वाट चुकली, पण मजा आली!

हा ट्रेक म्हणजे केवळ चालणं नाही, तर अनुभव, शिका, चुका करा आणि त्यातूनही स्मरणीय ट्रिप तयार करा याचं उत्तम उदाहरण! आता जेव्हा कोणी विचारेल "कात्रज ते कानिफनाथ ट्रेक कसा वाटला?" तर म्हणू शकतो – डोंगरात शिका, शहरात सांगा! 😄


तुम्हीही कात्रज ते कानिफनाथ ट्रेक केला आहे का?

कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा!


असेच आणखी योग आणि ट्रेकिंग अनुभव वाचण्यासाठी, ‘टेकडी ते ताडासन’ ब्लॉग फॉलो करा.

खाली कमेंट करा आणि "Tekdi ते ताडासन" या ब्लॉगचा भाग बना.


🚶‍♂️🧘‍♂️ पुन्हा भेटूच… पुढच्या टेकडीवर, पुढच्या आसनात!



#योग_सुंदर_आहे 

#टेकडीतेताडासन

चालता-बोलता योगी 🚶‍♂️




Post a Comment

1 Comments

  1. यावर मला तुम्हा अनुभवी लोकांच मत जाणून घ्यायला आवडेल.

    ReplyDelete

🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏

"टेकडी ते ताडासन: एक योगप्रवासाची सुरुवात"

1.1 UNESCO and the Indian Yoga Heritage – A Legacy of Spiritual Wisdom