पतंजलींच्या अष्टांग योगातील पहिली पायरी म्हणजे "यम" .
🧘♂️ यम – मनाची शुद्धी घडवणारी पहिली पायरी
योग शिकताना शरीरापेक्षा आधी मनाला शुद्ध करणं हे महत्त्वाचं असतं. पतंजलींनी मांडलेला अष्टांग योग याच विचाराने सुरू होतो – पहिल्या पायरीने – यम. हे पाच नियम आपल्या समाजातील वागणुकीशी, मनोवृत्तीशी आणि समाजातील नात्यांशी जोडलेले आहेत.
योगमार्गात सर्वप्रथम इतरांची समाजात कसा व्यवहार करावा याचा सर्वप्रथम विचार केला आहे...
"योगाचा अभ्यास करायचा असेल, आणि त्यापासून अपेक्षित फलप्राप्ती (शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक) हवी असेल, तर 'यम' हे पाळलेच पाहिजेत."
🌱 यम म्हणजे काय?
पतंजली योगसूत्र (2.30) मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे –
“अहिंसा-सत्य-अस्तेय-ब्रह्मचर्य-अपरिग्रहा यमाः”
— अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हेच यम होत.
🌿 पाच यम :
1. अहिंसा (Ahimsa)
📜 सूत्र: “अहिंसा प्रतिष्ठायां तत्सन्निधौ वैरत्यागः” (2.35)
— जेव्हा साधक अहिंसेवर दृढ होतो, तेव्हा त्याच्या उपस्थितीत वैरभाव नष्ट होतो.
कुणालाही दुखावू नये – हे फक्त हाताने किंवा शस्त्राने नाही, तर मनातूनसुद्धा. आपले शब्द जर कठोर असतील, कटू असतील, तर ती सुद्धा हिंसा आहे. अहिंसेचा सराव स्वतःपासून सुरू होतो – स्वतःला दोष देणं, ताण घेणं, ही देखील सूक्ष्म हिंसा आहे. अहिंसा ही केवळ कोणाला मारू नये इतकीच संकल्पना नाही.दुसऱ्याविषयी वाईट विचारही मनात आणू नका – कारण ही सुद्धा एक प्रकारची हिंसाच आहे. जेव्हा आपण "अहिंसा" या यमाचा अभ्यास करतो, तेव्हा तो केवळ शरीराच्या हिंसेवरच थांबत नाही, तर आपल्यातील वाईट भावना, द्वेष, मत्सर, राग या सर्वांचा नाश करण्याची ही प्रक्रिया आहे. आपल्या विचारांची शुद्धता ही योगाच्या वाटेवर पहिलं पाऊल असते.
2. सत्य (Satya)
📜 सूत्र: “सत्य प्रतिष्ठायां क्रियाफलाश्रयत्वम्” (2.36)
— सत्यावर स्थिर राहिल्यास प्रत्येक कृतीला योग्य फल मिळते.
सत्य म्हणजे फक्त खोटं न बोलणं नव्हे, तर प्रत्येक वेळी आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहणं. कधी कधी खरं बोलणं कठीण जातं, पण त्या क्षणी आपल्या नजरेत, आवाजात जर सच्चाई असेल, तर तोच खरा सत्ययोग होतो.
वाणी जी परमेश्वराने निर्माण केली ती सर्वांच्या कल्याणाकरता केली नाशा करिता नाही म्हणून खरे बोलण्याने जर काही नाश होत असेल तर त्यालाही सत्य म्हणून आहे मनापेक्षा सत्य भाषण करणे श्रेष्ठ.
3. अस्तेय (Asteya)
📜 सूत्र: “अस्तेय प्रतिष्ठायां सर्वरत्नोपस्थानम्” (2.37)
— जो जेव्हा चोरी करीत नाही, तेव्हा सर्व रत्नं आपोआप त्याच्याकडे येतात.
जे आपलं नाही, ते घेणं चुकीचं — ही तर सोपी व्याख्या. पण आपण कुणाचं श्रेय घेतो, कुणाचा वेळ नको तिथं वापरतो, हे सुद्धा अस्तेयाच्या विरुद्ध जातं. कधी कधी गप्प राहून, कुणालातरी मदतीपासून वंचित ठेवणं – ही देखील एक प्रकारची चोरी असते.
चोरी करण्याचा नुसता विचार मनात आला तरी त्याचा परिणाम आपल्या मानसिक स्वास्थ्यावर होतो, आणि पर्यायाने शरीरावरही होतो. विरोधी विचार, अपराधीपणा, भीती – हे सारे मनाच्या शांततेला बाधा पोचवतात.
अस्तेयाचं पालन केल्यास मन स्थिर राहतं, आणि सद्गुण, श्रद्धा आणि आत्मसंतोषाची बीजं उगम पावतात.
4. ब्रह्मचर्य (Brahmacharya)
📜 सूत्र: “ब्रह्मचर्य प्रतिष्ठायां वीर्यलाभः” (2.38)
— ब्रह्मचर्याचे पालन केल्यास मानसिक व शारीरिक बल प्राप्त होते.
ही पायरी प्रत्येक साधकासाठी वेगवेगळी असते. कोणी हे शरीरशुद्धीसाठी घेतो, कोणी मननियंत्रणासाठी. माझ्या अनुभवात, ब्रह्मचर्य म्हणजे फक्त संयम नव्हे, तर आपल्या ऊर्जेचं योग्य दिशेने रूपांतर — ध्यान, सेवा, साधना.
ब्रह्मचर्य म्हणजे संपूर्ण कामवर्ज्यता असा अपसमज सामान्यतः असतो.
प्रत्यक्षात, धर्म व शास्त्रांनी घालून दिलेल्या नैतिक मर्यादेत राहून, संयम राखून आयुष्य जगणं म्हणजेच खरा ब्रह्मचर्याचा मार्ग.
"स्वैराचार ही स्वतंत्रता नसून, ती एक सूक्ष्म गुलामी आहे."
जशी-जशी वासनांची अधीनता वाढते, तसंतसं मन, शरीर आणि विवेक या तिघांवरचं नियंत्रण सुटतं. स्वैराचारी वागण्याने आपण उलट अधिक बंधनात अडकत जातो.
5. अपरिग्रह (Aparigraha)
📜 सूत्र: “अपरिग्रहस्थैर्ये जन्मकथंतासंबोधः” (2.39)
— जो अपरिग्रह करतो, त्याला जन्माचा हेतू व ज्ञान प्राप्त होतं.
आपण खूप गोष्टी साठवतो — वस्तू, आठवणी, अपेक्षा. पण त्या सगळ्यांत गुंतून गेलं की साधना निघून जाते. जे जितकं हलकं, ते तितकं उंच उडतं — हेच अपरिग्रह शिकवतं. साधेपणा म्हणजे असं काही नाही की फक्त बाहेरच्या वस्तू सोडायच्या – पण "माझं" असं म्हणायचं सोडायचं.
अपरिग्रह म्हणजे कोणत्याही वस्तूंचा संग्रह न करणे आपणास न लागणाऱ्या गोष्टी जमा करून ठेवणे म्हणजे परिग्रह.
योग सांगतो की – जितकं तुम्ही सोडता, तितकं तुम्ही हलकं होता.
म्हणूनच अपरिग्रह म्हणजे स्वतंत्रतेकडे नेणारी सवय.
💭 आजच्या काळात यम पाळणं कितपत शक्य?
आपण सगळे एकसंध, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात वावरतो. या काळात अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अशा तत्त्वांचं शंभर टक्के पालन करणं थोडंसं कठीण वाटतं. पण म्हणून ते शक्य नाही असं नाही – जेवढं जमेल, तितकं प्रामाणिकपणे पाळत राहणं हीच खरी योगाची सुरुवात आहे.
प्रत्येक दिवस, प्रत्येक प्रसंग, प्रत्येक प्रतिक्रिया ही एक संधी असते — थोडा संयम, थोडं शुद्ध विचार, थोडा अपरिग्रह... आणि तिथूनच सुरू होते साधकाची प्रगती.
यम म्हणजे नुसतंच नियमांचं बंधन नाही — तर योगमार्गाच्या प्रगतीच्या दिशेने येणारा नेणारा एक साधा पण खोल दिशादर्शक आहे.
हे सर्व पूर्णता शक्य नसले तरी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच शक्य आहेत – आपण जेवढं शुद्ध राहू, तेवढा योग आपल्या जवळ येईल.
योगमार्ग हा एका दिवसाचा प्रवास नाही,पण आज एक पाऊल टाकणं — हीच खरी सुरुवात असते.
.....
✅ तुम्ही लेख पूर्ण वाचला, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
हा लेख तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये जरूर कळवा.
तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला पुढच्या लेखनासाठी प्रेरणा देत राहते.
📌 पुढचा लेख वाचण्यासाठी:
पुढचा भाग – "नियम – स्वशिस्तीची वाट" – लवकरच येत आहे.
तो चुकवू नये म्हणून आमच्या ब्लॉगवर पुन्हा अवश्य भेट द्या.
📬 संपर्कासाठी:
काही सूचना असल्यास,
कृपया संपर्क करा
पेजवरून आम्हाशी संपर्क साधा.
#योग_सुंदर_आहे
#टेकडीतेताडासन
चालता-बोलता योगी 🚶♂️
📖 वापरलेले संदर्भ ग्रंथ:
- 🕉️ योगसूत्रे – महर्षी पतंजली
(भाष्य: स्वामी सत्यनंद सरस्वती / स्वामी ओमानंद) - 📘 Light on Yoga – B.K.S. Iyengar
- 📗 Four Chapters on Freedom – स्वामी सत्यानंद सरस्वती
- 📙 योगदर्शन – पांडुरंगशास्त्री आठवले
- 📕 भगवद्गीता – श्रीकृष्ण (ध्यान: अध्याय 2, 3, 6)
- संपूर्ण योग विद्या — राजीव जैन
- योग प्रवेश — डॉ.विश्वास मंडलिक
- योग परिचय भाग एक — डॉ.विश्वास मंडलिक
- योग परिचय भाग दोन — डॉ.विश्वास मंडलिक
- योग परंपरा भाग एक — डॉ.विश्वास मंडलिक
- योग साधना व योग चिकित्सा रहस्य — स्वामी रामदेव
- प्राणायाम रहस्य — स्वामी रामदेव
लेखन: Tekdi ते ताडासन
© 2025 सर्व हक्क राखीव
0 Comments
🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏