योग म्हणजे काय?
✨ "योग" — एका चुकीच्या कल्पनेत अडकलेली खरी संकल्पना!
आज जगभरात ‘योग’ या शब्दाची खूप चर्चा होतेय. योगदिन, योगा क्लासेस, योगा अॅप्स, सेलिब्रिटींची योगाभ्यासावरील मतं... पण नेमका ‘योग’ म्हणजे काय?
केवळ आसने, प्राणायाम एवढेच योगाची व्याख्या मर्यादित ठेवणं चुकीचं ठरेल. योग ही एक जीवनपद्धती आहे — शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी विज्ञानसिद्ध प्रणाली. आणि हो, योगशास्त्र हे आता एक शास्त्र आहे, हेही सर्वांनी मान्य केलेलं आहे.
📸 सोशल मीडियावरची योग प्रतिमा — आणि खरी गोष्ट
आज "योग" म्हटलं की तुमच्या मनात काय येतं?
कदाचित एखादी मुलगी, जी रंगीत मॅटवर बसलेली आहे, शरीराची अद्भुत रचना करत आहे, तिचं शरीर लवचिक आणि चेहरा शांत...
पण तुम्ही थोडं थांबा... डोळे मिटा... आणि स्वतःला प्रश्न विचारा –
"हीच का ती हजारो वर्षांपूर्वी ऋषींनी मांडलेली 'योग' संकल्पना?"
नाही... योग म्हणजे केवळ अंग वाकवण्याचं / वळवण्याच कौशल्य नाही. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं संपूर्ण संतुलन.
🧘♂️ योगासनं — फक्त एक टप्पा
खरं सांगायचं तर — योगासनं ही त्या संपूर्ण प्रवासातली केवळ एक पायरी आहे.
“आसन केल्याने शरीर लवचिक होतं, पण योग केल्याने आयुष्य लवचिक होतं.”
पतंजली योगसूत्रांमध्ये सांगितलेल्या अष्टांग योगाच्या आठ पायऱ्यांमध्ये आसन ही फक्त तिसरी पायरी आहे.
पण आजच्या काळात योगासनांना व प्राणायामाला महत्त्व प्राप्त झाले आहे कारण त्याचे परिणाम लवकर दिसून येतात, शरीर संस्था व विकारांवरती त्याचा सुपरिणाम जाणवायला लागतो, अनुभूती मिळते.... म्हणून याचा सराव महत्वाचा आहेच.
🧘♀️ योगासनं — स्पर्धा नाही, साधना आहे!
आजकाल सोशल मीडियावर आपण दररोज कुणाचं तरी “perfect pose” पाहतो…
पण त्यामागे एक अजूनताच भाव आहे — "माझं शरीर एवढं वाकत नाही..."
हळूहळू ही भीती योगासनांपासून लांब नेत जाते.
मग योगही लांब जातो.
📜 महर्षी पतंजलींचं सूत्र — "स्थिरसुखमासनम्"
महर्षी पतंजलींनी “योग” या विखुरलेल्या ज्ञानाला सूत्रबद्ध केलं. पतंजली योगसूत्राची निर्मिती केली, त्यांचं सूत्र:
"स्थिरसुखमासनम्" (पतंजली योगसूत्र २.४६)
“जे स्थिर आणि सुखद आहे, तेच आसन आहे.”
आसन म्हणजे शरीर वळवणं नव्हे — तर स्थैर्य आणि मन:शांती निर्माण करणं.
🌱 पूर्ण आसन शक्य नसलं, तरी प्रयत्नात योग आहे
उदाहरण: जर तुम्ही पायापर्यंत वाकू शकत नसाल तरीही जेवढं करता येतं, तेवढं प्रामाणिकपणे करणं — हेच तर योग आहे.
- स्नायू ताणले जातात
- रक्ताभिसरण सुधारतं
- शरीर सैल होतं
- मनात सकारात्मकता निर्माण होते
योग ही स्पर्धा नाही — तो स्वतःच्या आत जाण्याचा प्रवास आहे.
🧠 शरीराचा आदर्श नव्हे, तर मनाचा स्वीकार!
प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं — वय, प्रकृती, अनुभव, व्याधी.
योगासन म्हणजे “आत्मस्वीकार.”
“माझं शरीर जिथं आहे, तिथूनच माझी साधना सुरू होते.”
“योग म्हणजे सुंदर वाटणं नव्हे, तर शांत वाटणं!”
🌿 अष्टांग योग — टप्पे समजून, शक्य तितकं आचरणात आणूया
अष्टांग योगात सांगितलेले यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी — हे टप्पे सर्वांसाठी शक्य नसतील.
पण जे शक्य आहे, ते प्रामाणिकपणे करणं — हेच खऱ्या साधनेचं द्योतक आहे.
हो, आपण आसनांचा अभ्यास नक्कीच करणार आहोत —
पण एक गोष्ट स्पष्ट लक्षात घ्यायला हवी: हा प्रवास 'परिपूर्णता'साठी नाही, तर 'समर्पणासाठी' आहे. आज अनेक लोक फक्त ह्या भीतीने योगाकडे वळत नाहीत की
"मला आदर्श स्थिती जमत नाही",
"माझं शरीर वाकत नाही",
"मी पूर्ण आसन करू शकत नाही"...
"मला जमलं नाही तर माझा हस होईल का लोक मला हसतील का ?"
आणि म्हणूनच ते योगासनांपासून — आणि त्यातून मिळणाऱ्या अमूल्य लाभांपासून — वंचित राहतात.
पण खरंच विचार करा —
जर आदर्श स्थिती जमली नाही म्हणून आपण प्रयत्नच टाळत असू, तर मग ती साधना कशी होणार?
आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे:
आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार,
आपल्या मनाच्या स्थैर्यानुसार,
आणि आपल्या आत्म्याच्या समर्पणानुसार...
जसं जमेल, तसं सुरू करायचं.
योग ही अट नाही, ती संधी आहे —
स्वतःकडे परत येण्याची.
जिथं तुम्ही आहात, तिथूनच सुरू करा — योग तुमचं हात धरायला तयार आहे.
#योग_सुंदर_आहे
#टेकडीतेताडासन
चालता-बोलता योगी 🚶♂️
#योग #योगासन #आसन #योगशास्त्र #अष्टांगयोग #पतंजलीयोगसूत्र #योगमार्ग #प्राणायाम #ध्यान #समाधी #स्वतःचास्विकार #मनशांती #स्वस्थजीवन #भारतीयपरंपरा #योगप्रवास

0 Comments
🗨️ तुमचं मत खाली जरूर कळवा! नाव टाकून साधं "छान वाटलं" लिहिलंत तरी आम्हाला बळ मिळेल 🙏